मनुस्मृती पुरुस्कृत दुसऱ्या प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावर आपण आहोत का? -डॉ.सतीशकुमार पडोळकर

  मनुस्मृती पुरुस्कृत दुसऱ्या प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावर आपण  आहोत का? 

-डॉ.सतीशकुमार पडोळकर 

सन १९४९ च्या २५ नोव्हेंबर रोजी, राज्यघटनेचा मसुदा पूर्ण तयार झाल्याचा आनंद संविधान सभेतील सर्वच सदस्यांना असतांना, या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे प्रमुख म्हणून संविधनाचे महत्वाचे शिल्पकार असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मात्र अस्वस्थ होते. लोकशाहीवादी राज्यघटनेच्या भवितव्याविषयी ही अस्वस्थता आपल्या भाषणातून व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, “माझ्या मनात आज आपल्या देशाच्या भवितव्याचेच विचार आहेत. भारतास संसदीय कार्यपद्धती माहीतच नव्हती, असे नाही. बौद्ध संघ साऱ्याच संसदीय कार्यपद्धतींचे पालन करीत आणि या पद्धती बौद्धांनी तत्कालीन राजसभांकडून घेतल्या होत्या, असे मानण्यास जागा आहे. ही लोकशाहीवादी पद्धती भारत कालौघात हरवून बसला. त्यामुळेच अशी दाट शक्यता वाटते की, आपली नव्याने जन्माला आलेली लोकशाही वरवर पाहता अबाधित भासेल, पण वास्तवात तिचे रुपांतर हुकुमशाहीत, एकाधिकारशाहीत होईल. या दुसऱ्या शक्यतेचा धोका खरोखरच अधिक दिसतो.”  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेला हा धोका आज प्रत्यक्षात भारतीय लोकशाहीच्या समोर आवासून उभा आहे. आज लोकशाहीच्या आडून एकाधिकारशाही, हुकुमशाहीने भारतीय नागरिकांच्या  अधिकारांवर घाला घातला असल्याचे दिसून येते. विवेकवादी, सुधारणावादी  धर्ममतांना, नैतिक आचरण करणाऱ्याला बदनाम करून दुय्यम ठरवणे  व त्यांना जनमाणसांतून  हद्दपार करणे अशा प्रकारची कामे येथील सनातन  प्रवृत्तींच्या प्रतिक्रांतीने अगदी  मौर्य साम्राज्याच्या पाडाव झाला तेव्हापासून केली आहेत. अगदी तशाच प्रकारची प्रतिक्रांती २०१४ च्या सत्ताबदलानंतर पुन्हा एकदा जोमाने उभी राहिल्याचे दिसून येत आहे. याला तशी काही करणे ही आहेत. ज्या पद्धतीने २०१४  च्या सत्ता बदलाने लोकांच्या  व्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षा संकुचित केल्या गेल्या आहेत, झुंडशाही व हिंसात्मक प्रवृत्तीमध्ये झालेली वाढ, खालच्या जातीं व अल्पसंख्यांक समुदायावर होणाऱ्या अत्याचारावर व असमाजिक प्रवृत्तीवर सोयीस्कर मौन बाळगून या अशा प्रवृत्तीला छूपे प्रोत्साहन देणाऱ्या राजसत्तेचे  हे कृत्य धर्मसत्तेच्या हातातील बाहुले बनून सुरु असलेल्या सांस्कृतिक व धार्मिक प्रतिक्रांतीच्या पुनर्रस्थापनेची स्पष्ट साख देते. दिल्लीत भाजपाच्या राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी संविधानाबद्दल केलेल्या वल्गना असो किंवा मनुस्मृती संदर्भात केलेले भाष्य असो, महाराष्ट्रात संभाजी भिडे या सज्जनांनी केलेले मनुस्मृती व संविधानासंदर्भातील वक्तव्य असो किंवा देशाची राजधानी दिल्लीमध्ये संविधान जाळण्याचा झालेला प्रकार व त्याच दरम्यान मनुस्मृतीचे समर्थन करणाऱ्या घोषणा दिल्या जाणे या सर्व बाबी प्रतिक्रांतीच्या  प्रवेशाच्या  द्योतक आहेत. कारण सांस्कृतिक व धार्मिक प्रतिक्रांती ने  अगदी मौर्यांच्या पाडावापासून राजसत्तेच्या आगमनानंतरच आपला प्रभाव निर्माण केला आहे. यासंदर्भात डॉ.आ.ह. साळुंखे लिहितात, “इ.स. पू. ३२१ मध्ये चंद्रगुप्त मौर्य गादीवर बसला. त्यानंतर सुमारे सव्वाशे वर्षे मौर्यांची  राजवट चालली. या वंशातील बृह्द्रथ नावाच्या राजाने पुष्यमित्र नावाच्या ब्राह्मणाला सेनापती नेमले होते. या सेनापतीने सैन्यात कटकारस्थाने केली आणि इ.स. पूर्व १८७ मध्ये एकदा राजा सैन्याची पाहणी करीत असतांना त्याची हत्या करून सत्ता हस्तगत केली. या निमित्ताने ब्राह्मणांच्या हाती सांस्कृतिक, धार्मिक सत्तेबरोबरच राजकीय सत्ताही आली. या सत्तेने संपूर्ण समाजाचे हित साधण्याऐवजी केवळ ब्राह्मणाचे कल्याण करण्याचे धोरण अवलंबले. त्याला धर्मशास्त्राचा आधार देण्यासाठी मनुस्मृती हा ग्रंथ निर्माण केला. पुढची तीन- चारशे वर्षे या ग्रंथात फेरफार होत राहिले असावेत आणि इ.स. दोनशेच्या सुमारास या ग्रंथाला आजचे स्वरूप प्राप्त झाले असावे, असे स्थूलमानाने म्हणता येते.” (साळुंखे आ.ह, मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती,पृ.३२)  प्रतीक्रांतीच्या या षड्‍यंत्रावर भाष्य करताना  डॉ. सुखदेव थोरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मताचा दाखला देत लिहितात, “डॉ.आंबेडकरांच्या मते, साधारण इसवी सनपूर्व १८५ ते इ.स.पूर्व १५० या काळात, मौर्य राजघराण्याच्या एका उच्चकुलीन सेनापतीने राजास मारून बौद्ध धम्म मानणाऱ्या राज्यावर स्वत:चा   अंमल स्थापन केला, तेव्हापासून ही ‘प्रतिक्रांती’ सुरु झाली. ही केवळ एक राजकीय घटना मानता येणार नाही, तर ती धार्मिक प्रतिक्रांती होती, हे पुढच्या काळातील घटनाक्रमावरून मान्य करावे लागते. याच काळात (साधारण इसवी सं पूर्व १७०) मनुस्मृतीची संहिता तयार होवून वर्णव्यवस्था पाळणाऱ्या धर्माचे पुनरुजीवन तिच्या आधारे होऊ लागले. उच्चवर्णीयांचे विशेष हक्क आणि निम्नवर्णीयांना ‘मानवी अधिकार नाकारणे’ ग्राह्य मानून त्याप्रमाणेच कायदा राबविण्याचे बंधन मुनुस्मृतीमुळे राज्यव्यवस्थेवर आले. ही केवळ नीतीसंहिताच नव्हे तर विधीसंहिता होती, कारण वर्ण जातीची बंधने मोडू  पाहणाऱ्यांना कठोर आणि हिंसक शिक्षाचांही समावेश त्या संहितेत होता. या प्रतिक्रांतीपायी अखेर, भारतातून बुद्ध धम्माची पीछेहाट झाली. डॉ.आंबेडकरांनी बुद्ध धम्माच्या ऱ्हासाला काही अंशी इस्लामला कारणीभूत ठरवले. परंतू त्यांनी हेही अभ्यासपूर्वक दाखवून दिले आहे की, इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकात मौर्य साम्राज्याचा पाडाव झाला तेव्हापासून, ब्राह्मिनिकल किंवा ‘सनातन’ धर्माच्या फेरस्थापनेसाठी बौद्धांविरुद्ध अत्यंत हिंसक मार्ग वापरले गेले. आणि त्यामुळे बौद्ध धम्माची पीछेहाट झाली. ही पीछेहाट बाराव्या शतकात झालेल्या इस्लामी आक्रमणापर्यंत म्हणजे सुमारे हजार वर्षे सुरु राहिली होती. स्वातंत्र्य, समान हक्क, अहिंसा, बंधुता या मूल्यांची रुजवण समाजात बौद्ध धम्माने केली होती, ती मूल्ये या काळात लयाला गेली म्हणून ही ‘प्रतिक्रांती’ ठरते.” पुष्यमित्र शृंगाने कपट नीतीने केलेली ही प्रतिक्रांतीला सनातन्याकडून  अथवा मनुस्मृतीच्या समर्थकांकडून राजकीय क्रांती जरी मानली जात असली तरी ती, धार्मिक व सांस्कृतिक प्रतीक्रांतीच होती. या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘क्रांती आणि प्रतिक्रांती’ पुस्तकात लिहितात, “पुष्यमित्राची क्रांती ही फक्त राज्याक्रांतीच असती तर त्याला बौद्धधर्मियांच्या छळाची मोहीम काढणे आवश्यक नव्हते. ही छळाची मोहीम गझनीच्या महंमदाने हिंदूविरूद्ध काढलेल्या छळाच्या मोहिमेपेक्षा निराळी नव्हती. पुष्यमित्राचा उद्देश मुख्यत: बौद्ध धर्म नष्ट करून ब्राह्मणी धर्माची स्थापना करणे हाच होता...याचा पुरावा  मनुस्मृतीला कायदा  म्हणून दर्जा देण्याची घोषणा हा आहे.” (डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांती आणि प्रतिक्रांती, पृ.४३) आज राजकीय बदलानंतर सांस्कृतिक व धार्मिक प्रतीक्रांतीच्या अनुषंगाने मनुस्मृतीला कायद्याचा दर्जा देण्याची गरळ ओकली जात आहे. राज्यघटनेत नाहक बदल करून राज्यघटना पुरुस्कृत समता,न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, व्यक्तीस्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टीकोन  यासारख्या मूल्यांना हरताळ फासला जात आहे. आज सरकार पुरस्कृत व्यवस्था समतेच्या ठिकाणी समरसता लागू करू पाहत आहे. जो शब्द समतेच्या पूरक नाही. विशिष्ट लोकांना झुंडशाहीने मारहाण होतांना सरकार कान, डोळे आणि तोंड बंद करून  झुंडशाहीला मूकसंमती देत आहे. न्याय नावाची गोष्ट दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली आहे. धर्मनिरपेक्षतेची जागा आता हिंदू राष्ट्राने घेतलेली आहे. यागोष्टीचे लोक आता उघड समर्थन करत आहेत. राष्ट्रपिता गांधीजींना आज देशद्रोही, हिंदूद्रोही संबोधले जात आहे. त्यांच्या प्रतिमा व पुतळे तोडले जात आहेत. यापुढेही जाऊन गांधी हत्या दिवस साजरा केला जात आहे. गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या चालवून जल्लोष केला जात आहे. समाजवादाची जागा भांडवलशाहीने घेतलेली आहे. ठराविक भांडवलदाराच्या मर्जीनेच देशातील निर्णय घेतले जात आहेत. एकीकडे हजारो कोटी बुडवलेले उद्योजक सही सलामत देशाबाहेर जात आहेत. उद्योजकांचे हजारो कोटी रुपये कर्ज माफ होत असतांना शेतकऱ्यांबाबत सरकार उदासीन आहे. शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागला आहे. लोकांच्या  बोलण्याच्या स्वातंत्र्याच्या सीमा संकुचित केल्या जात आहे. सरकार विरोधी प्रत्येक आवाजाला देशद्रोहाचे प्रमाणपत्र दिले जात आहे. स्वत: प्रधानसेवकच अवैज्ञानिक वक्तव्ये करू लागले आहेत. गणपती ही पहिली प्राचीन भारतीय प्लास्टिक सर्जरी असल्याची वल्गना करून ऊर बडवून घेत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी खुशाल स्मशान आणि कब्रस्तानच्या गोष्टी करत आहेत. अशा राजकीय वातावरणात मनुस्मृतीचा जयघोष होणे आणि भारतीय राज्यघटनेला हिणकस म्हणण्याच्या घटनात वाढ होणे स्वाभाविकच आहे. याचाच पुढील अध्याय म्हणजे  ‘न्यूज १८’ च्या एका कार्यक्रमात बोलताना शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे म्हणाले, “डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे. राजस्थान विधानसभेच्या भवनाबाहेर मनूचा पुतळा उभा करण्यासाठी पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर गेले होते. मनूचा जो पुतळा उभा करण्यात आला होता, त्या पुतळ्याखाली “मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता” असं बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलं असा दावा भिडेंनी केला. तसचं संविधान देशासाठी अर्पण करताना, मी हे मनुस्मृतीचा अभ्यास करून  लिहिलं असंही बाबासाहेब म्हणाले होते, असा दावाही  भिडेंनी केला आहे. याशिवाय याचा पुरावाही मिळेल तो मीडियाने शोधून काढावा.” (https://www.loksatta.com/maharashtra-news/sambhaji-bhide-says-babasaheb anbedkar-wrote-the-constitution-by-studying-manusmriti-1714702/) 

दूसरीकडे भाजपाचे पूर्व केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे म्हणाले होते की, भाजपा ‘संविधान बदलण्यासाठी’ सत्तेत आली आहे. कोप्पल जिल्ह्यातील कुकनूर मधील एका कार्यक्रमा दरम्यान हेगडे म्हणाले होते, “लोक धर्मनिरपेक्ष शब्दाबाबत यामुळे सहमत आहेत की, हे संविधानामध्ये लिहिले आहे. याला (संविधानाला) खूप पूर्वीच बदलायला हव होतं, आता आम्ही याला बदलणार आहोत.” 

(https://khabar.ndtv.com/news/india/bjp-make-distances-itself-from-ananth-kumar-hegdes-remarks-over-constitution-1792478/amp/1)

 मौर्यांच्या काळात कौटिल्याच्या  अर्थशास्त्राच्या नियमानुसार चालणारी मौर्याची राजवट ब्राह्मणांना खास स्थान देण्याऐवजी त्यांना इतरांशी समान मानत होती. नेमणुका करणे, गुन्ह्यांना शिक्षा देणे इ. बाबतींत जात वा वर्ण न पाहता निर्णय घ्यावेत, असे धोरण होते. यामध्ये ब्राह्मणांवर कोणताही अन्याय होत नव्हता. पण स्वत:ला श्रेष्ठ स्थान मिळाले पाहिजे, अशी भावना असणार्‍या ब्राह्मणांचा जीव या व्यवस्थेमध्ये गुदमरत होता. यात बदल व्हावा म्हणून ते तडफडत होते. तो बदल घडवून आणण्यासाठी ते संधीचीच वाट बघत दबा धरून बसले होते.आपली अपप्रचाराची शक्ती पणाला लावून समाजामध्ये मौर्याच्या राजवटीविरूध्द  क्रमाक्रमाने विष भरण्याचे काम ते करीत होते. ज्यावेळी पुष्यमित्राने शेवटचा मौर्य राजा बृहद्त्र ची षड्‍यंत्रपूर्वक हत्या केली अगदी त्यावेळीच राजसत्तेच्या बळावर पुष्यमित्राच्या काळात मनुस्मृती लिहिली गेली. आता अर्थशास्त्राच्या जागी आता मनुस्मृती आली. ज्यामध्ये ब्राह्मणांसाठी विशेष अधिकारांची तरतूद करण्यात आली. ही बाब फक्त ग्रंथ परिवर्तनापुरती मर्यादित नाही. याच्या अंतर्गत सांस्कृतिक,सामाजिक व राजकीय प्रतिक्रांतीची बीजे आहेत. ही बा स्पष्ट करताना डॉ. आ.ह. साळुंखे लिहितात, “मनुस्मृतीच्या निर्मितीपूर्वी मौर्यांचे राज्य होते. या राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्याने केली होती. या राज्यस्थापनेला हातभार लावणाऱ्या कौटिल्याने अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला होता. मौर्याच्या राजवटीत हाच ग्रंथ राजांच्या दृष्टीने मार्गदर्शक होता याचा अर्थ स्पष्ट आहे-पुष्यमित्र शुंगाने नुसती मौर्याची राजवटच संपवली नाही, तर राजनीतीचे मार्गदर्शन करणाऱ्या, ‘राज्यघटने’ प्रमाणे असलेल्या अर्थशास्त्राच्या जागी मनुस्मृती आणली. एका दृष्टीने राज्यघटनाच बदलली.” (साळुंखे आ.ह, मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती,पृ.३५)  

आज राजसत्तेच्या बदलानंतर पुन्हा एकदा वैदिक,सनातन धर्म समर्थक  देशाची राज्यघटना बदलू पाहत आहेत. राज्यघटनेच्या जागी मनुस्मृतीची व्यवस्था निर्माण करू पाहत आहेत. यासाठी त्यांनी सर्वप्रथम इतिहासाचे विकृत्तीकरण करणे सुरु केले आहे. त्यांच्या व्यवस्थेच्या आड येणाऱ्या प्रत्येक ऐतिहासिक व्यक्तीस बदनाम केले जात आहे. त्यांच्या विरोधात व्यवस्थेच्या आवाज उठविणाऱ्या विचारवंतावर हल्ले होत आहेत. राजसत्तेच्या विरोधात बोलणारी प्रत्येक व्यक्तीला आज देशद्रोही,धर्मद्रोही, आतंकवादी ठरवून अशा हत्यांचे समर्थन केला जात आहे. मनुस्मृतीच्या समर्थकांनी याअगोदर ही त्यांच्या हिताच्या आड येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अशाच पद्धतीने बदनाम केले आहे. समाजातून एखाद्याला बदनाम केले की, आपले नियोजित काम करण्याची मुभा आपसूकच मिळते. हे मनुस्मृतीच्या समर्थकांचे एक धोरण आहे. बृहद्त्र हत्येचे समर्थन करताना ब्राह्मणी व्यवस्था समर्थक कोणत्या अफवा पसरवितात वा कशा प्रकारे त्या राजाला बदनाम करतात ही बाब स्पष्ट  करताना  डॉ. आ.ह. साळुंखे  लिहितात, “ या हत्येला नैतिक ठरविण्यासाठी तिच्यावर धार्मिकतेचा बुरखा चढविण्यात आला. मौर्यराजे धर्मद्रोही होते, असा प्रचाराचा धुमधडाका उडवला गेला. त्याच काळात ग्रीकांची आक्रमणे चालू होती आणि बौद्ध लोक परक्यांना मदत करतात असा प्रचार करून बौद्धांनाही समाजद्रोही ठरविण्यात आले. ग्रीक हे शत्रू होते. तेव्हा, त्यांना मदत करणारे बौद्ध हे फितूर होते,असे वादासाठी मान्य केले, तरी ग्रीकांचा व बौद्धांचा पाडाव केल्यानंतर निर्माण केलेल्या मनुस्मृतीने सर्व समाजाच्या हिताचा समंजस विचार करण्याच्या ऐवजी ब्राह्मणांच्या हितांचे अत्यंत हीन प्रकारचे पोषण का केले? ब्राह्मणांना देवापेक्षाही श्रेष्ठ करून इतरांना किड्या-मुंग्याच्या पातळीवरचे जीवन का देऊ केले? बाहेरच्या शत्रूंकडे बोट दाखवून सगळ्या समाजाला आपल्या पाठीमागे खेचून घेतल्यानंतर त्या समाजाची प्रतिभा सर्वांगांनी फुलवण्याऐवजी त्याला मातीत गाडून फक्त ब्राह्मणांच्या प्रतिभेलाच पालवी का फुटू दिली? कारण स्पष्ट आहे. परक्यांच्या आक्रमणांचा बागुलबोवा दाखविण्यामागे एक स्वार्थ होता. वस्तुतः, भारताच्या इतिहासात मनुस्मृतीचे समर्थक परक्यांना वारंवार वश झाले आहेत. त्यांच्या नोकर्‍या करून, त्यांच्याकडून दक्षिणा घेऊन सुखाने राहिले आहेत. म्हणून तर कौटिल्याने त्यांचे सैन्य उभारू नये, असे म्हंटले आहे. त्यांची इच्छा एवढीच होती,की त्यांच्या सुखोपभोगावर कोणी गदा आणू नये.सर्वांचे मस्तक त्यांच्या पायांवर असावे. आणि मौर्याच्या राजवटीत नेमके हेच घडत नव्हते. वस्तुतः, मौर्यांची राजवट ही काही अनैतिक नव्हती. माणुसकीचा धर्म ती जरूर मानत होती. तिच्यात दोष नसतील, असे नव्हे. परंतु खरा मुद्दा होता तो, ब्राह्मणांच्या अन्यायी हितसंबंधांचे ती पोषण करीत नव्हती हा. ब्राह्मणांचे हितसंबंध जपणे हाच धर्म आणि त्या धर्माला विरोध करणारा तो अधार्मिक अशी बुमिका असल्यामुळे मौर्याच्या राजवटीला अधार्मिक ठरविले होते, इतकेच. थोडक्यात म्हणजे, ब्राह्मणांच्या ओंजळीने पाणी पिणारा राजा हा धार्मिक आणि तसे करायला नकार देणारा राजा हा कितीही न्यायी असला तरी अधार्मिक, अशी कसोटी होती.” (साळुंखे आ.ह, मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती,पृ.३५)  

आज मनुस्मृती समर्थकांकडून ज्या प्रकारे गांधी हत्येचे समर्थन केले जात आहे. गांधी हत्या दिवस साजरा केला जात आहे. हिंदूचे विरोधक, धर्मद्रोही व मुस्लीम धार्जिणे अशी एक प्रकारे गांधीजींची छबी निर्माण केली जात आहे. नेहरुंना वेगवेगळ्या अफवांच्या माध्यामातून बदनाम व चारित्र्यहीन ठरवले जात आहे. देशामधील सध्य स्थितीतील सर्व समस्यांना नेहरुच कारणीभूत आहेत. म्हणून त्यांच्या विचारांचा व त्यांच्या पक्षाला देशातून समूळ नष्ट करण्याच्या वल्गना या मनुस्मृतीच्या विचारधारेतून समोर येत आहेत. 

मनुस्मृतीने स्त्रियांना दुय्यम स्थान दिले आहे. तीच व्यवस्था समाजात रुजविण्याचे काम वेगवेगळ्या माध्यमातून मनुस्मृतीचे समर्थक करत आहेत. सध्य स्थितीत तीर्थंकर बाईंनी केलेले वक्तव्य त्याच व्यवस्थेचे द्योतक आहे. शूद्र स्त्रीपासून उत्पन्न मुलांचे स्थान हलकेच मानले गेले आहे. मनुस्मृती मध्ये कामपूर्तीसाठीच बहुपत्नीत्वाला मान्यता आहे.उच्चवर्णीयांच्या कामतृप्तीबाबत विचित्र नियम आहेत. उदा. ‘वरच्या वर्णातील पुरुषांशी संभोग करणाऱ्या कन्येला थोडाही दंड करू नये.परंतु खालच्या वर्णातील पुरुषांशी संभोग करणाऱ्या कन्येला मात्र घरात कोंडून ठेवावे.’ मनुस्मृतीला घटस्फोट मान्य नाही. नवरा चारित्र्यहीन असला अथवा स्वैराचारी असला,तरी स्त्रीने त्याची देवाप्रमाणे पूजा करावी.’ ही मनुस्मृतीची  संहिता आहे. मनुस्मृतीच्या या समर्थकांनी प्राचीन काळापासून भारतीय समाज व्यवस्थेत उच्च स्थानी बसण्यासाठी, दुसऱ्याच्या धडावर आपले डोके लावून  शोषणाची नीती अवलंबली आहे. यासंदर्भात रावसाहेब कसबे लिहितात, “प्राचीन काळापासून ते ब्रिटीश भारतात येईपर्यंत भारतीय समाजव्यवस्थेत उच्च स्थानी असलेल्या ब्राह्मणांची सारी विद्वता फक्त चातुर्वर्ण्यव्यवस्थेचे समर्थन करण्यात खर्च झाली आणि क्षत्रियांची सारी शक्ती त्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीत खर्च झालेली दिसते. भारताच्या मागसलेपाणाचे हेच एक प्रमुख कारण असावे.” ( डॉ.कसबे रावसाहेब, झोत,पृ.९) 

मनुस्मृती  चातुर्वर्ण्यव्यवस्थेच्या निर्मितीचा मूलगामी ग्रंथ आहे. तिच्या मते, चातुर्वर्ण्य ब्रह्मदेवानेच निर्माण केले आहे,

“लोकानां तु विवृध्दयर्थं मुखबाहूरुपादत:।

ब्राह्मणं क्षत्रिय वैश्यं शूद्रं च निरवर्तयत ।।१.३१ ।। 

-मनुस्मृती 

मनुस्मृतीची ही व्यवस्था ब्राह्मण श्रेष्ठत्वाला चालना देणारी आहे. ही  विषमतेची व्यवस्था आहे. या व्यवस्थेनुसार एका विशेष वर्गाला व वर्णाला येथील समाजव्यवस्थेमध्ये  मालक बनवणे  आहे. हे या व्यवस्थेचे लक्ष्य आहे. अशा विषमतावादी व्यवस्थेला आपण थुसिडाइड्स प्रमाणे आपण प्रश्न विचारणे गरजेचे आहे,

“आमचे मालक बनणे

तुमच्या हिताचे असेल

पण तुमचे गुलाम 

बनण्यात आमचे कोणते हित आहे?”

त्यामुळे येत्या काळात दुसऱ्या प्रतिक्रांतीचे ढग अधिक गडद होणार आहेत. त्याविरोधात लढण्यासाठी अथवा वर्तमान प्रतिक्रांती थोपवून लावण्यासाठी देशातील बहुजन समाजाला या प्रतिक्रांतीला समजून घ्यावे लागेल. या प्रतिक्रांती विरोधात वैचारिक असा कृतिकार्यक्रम आखावा लागेल. ज्याप्रमाणे लेनिन म्हणाला होता, “विचारांशिवाय व्यवहार आंधळा असतो आणि व्यवहाराशिवाय विचार हा वांझोटा असतो” लेनिन ने सांगितलेली ही बाब सर्वांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे.  नाहीतर मनुस्मृती पुरुस्कृत दुसऱ्या प्रतिक्रांतीच्या आगीमध्ये आपण होरपळून निघाल्याशिवाय राहणार नाही.

( डॉ.आ.ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी जन्मदिवसाच्या औचित्याने जत, जि.सांगली येथे डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’ या पुस्तकावरील डॉ.सतीशकुमार पडोळकर यांच्या भाषणाचा अंश)   


Comments

Popular posts from this blog

भारतीयतेचे दूसरे रूप म्हणजे हिंदी: प्राचार्य डॉ.सुरेश पाटील

राजे रामराव महाविद्यालयात अंधश्रद्धा: प्रभाव, परिणाम व उपाय या विषयावर कार्यशाळा संपन्न