मंगळवेढे भूमी संतांची - डॉ.सतीशकुमार पडोळकर

 

भारतीय इतिहासाचा गौरवशाली वारसा असणारी ‘मंगळवेढा’ नगरी ही धर्म, अध्यात्म, साहित्य, समाजप्रबोधन व नैतिक राजकारणाची जगभर छाप सोडणाऱ्या महापुरुषांची भूमी आहे. देशाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक व भक्तीच्या क्षेत्रात एक विधायक घुसळण करणारी व विवेकाचा आवाज बुलंद करणारी मंगळवेढ्याच्या मातीत उगवली. अशा या हाडामासाच्या माणसांनी देशाच्या तत्कालीन सांस्कृतिक, अध्यात्मिक व सामाजिक रूढी-परंपरेच्या विरोधात बंड पुकारले. ‘विद्रोह’ हा या मातीचा गुणधर्म आहे. संत व महापुरुषांच्या पदस्पर्शानॆ व कार्यांनॆ पावन झालेली ही भूमी. मंगळवेढा ही नगरी प्राचीन कलावैभवाची साक्षीदार आहे. इथं बुद्ध, जैन, नाथ, शैव-वैष्णव अशा अनेक संस्कृती व संप्रदायाचे भग्न अवशेष सापडतात. या मातीत अनेक विचार वाढले, रुजले व मानवतेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिले.

मंगळवेढ्यात इ.स. १०६ ते इ.स. १८१८ च्या काळात चालुक्य, देवगिरीचे यादव, कलचुरी, बहामनी, अदिलशाही, छत्रपती शाहू अनेक राज्यकर्त्यांचा अंमल होता. याच मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ल्यात १८ नोव्हेंबर १६६५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज व राजा जयसिंग यांची भेट झाली होती. याच भूमीत बसव धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर वाढले. संत चोखामेळांनी सामाजिक समतेचा जागर केला. संत कर्ममेळा, संत सोयराबाई, संत निर्मळा, संत बंका, संत कान्होपात्रा, संत दामाजीपंत, हजरत पीर गैब वो मर्दाने गैब (रह.), महान साध्वी गोपाबाई, बाबा महाराज आर्वीकर, संत मौनिबुवा, टीकाचार्य, संत लतिफ बुवा, सिताराम महाराज, स्वामी समर्थ अक्कलकोटकर, कल्याणसाहेब, प्रल्हाद शिंदे यांच्यासारखे महापुरुष होऊन गेले.

आज देशातील एकूण सांस्कृतिक व राजकीय वातावरण पाहता अध्यात्म व भक्ती परंपरेचे पुनर्मूल्यांकन होणे आवश्यक वाटते. याचे प्रमुख कारण म्हणजे देशात झालेल्या सर्व राजकीय क्रांतीचा आधार हा धार्मिक आणि सामाजिक क्रांती हाच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक स्तरावर झालेल्या राजकीय क्रांतींबद्दल एक सिद्धांत १९३६ साली मांडला होता. ते सांगतात, “जगाचा इतिहास आपल्याला असे सांगतो की राजकीय क्रांती ही सामाजिक आणि धार्मिक क्रांतींच्या पायावरच उभी असते. युरोपियन समाजांची मुक्ती करणारी राजकीय चळवळ ही मार्टिन ल्युथर यांनी केलेल्या धार्मिक सुधारणावर उभी होती. इंग्लंडमध्ये झालेल्या प्युरॅटिनिझमच्या चळवळीने राजकीय स्वातंत्र्य निर्माण केले. त्यामुळे एका नव्या जगाची स्थापना झाली. ती एक धार्मिक चळवळ होती. याच धार्मिक प्युरॅटिनिझमच्या चळवळीने अमेरिकेच्या स्वातंत्र्याला जन्माला घातले. हेच तत्व मुस्लिम साम्राज्यालाही लागू पडते. अरबांचा एक राजकीय शक्ती म्हणून उदय होण्यापूर्वी प्रेषित महम्मदांनी धार्मिक क्रांती करून ठेवलेली होती. भारतीय इतिहासाच्या अभ्यासातून हाच निष्कर्ष निघतो. भारतात चंद्रगुप्ताने केलेल्या राजकीय क्रांतीला बुद्धाने केलेल्या सामाजिक आणि धार्मिक क्रांतीचा पाया होता. छत्रपती शिवाजींनी ज्या राजकीय क्रांतीचे नेतृत्व केले, तिचा पाया महाराष्ट्रातील संतमंडळाने धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडवून आणून त्यापूर्वीच घातला होता. शिखांनी केलेल्या राजकीय क्रांतीचा आधार गुरु नानक यांनी केलेली धार्मिक आणि सामाजिक क्रांती हाच होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वरील विचारात महाराष्ट्रातील संतांच्या भक्ती चळवळीचे कार्य अधोरेखित केले आहे. कोणतीही सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय आभाळातून पडत नाही.

महात्मा बसवेश्वर:

महात्मा बसवेश्वर हे काही वर्षे मंगळवेढ्यात होते. म्हणूनच यावर्षीच्या राज्य अधिवेशनात महात्मा बसवेश्वरांचे स्मारक मंगळवेढ्यात मोठ्या स्वरूपात व्हावे असा प्रस्ताव पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारतनाना भालके यांनी मांडला होता. महात्मा बसवेश्वरांसंदर्भात एक प्रचलित लोकश्रुती अशी आहे. एकदा बसवेश्वरांनी बिज्जळ राजाला दरबारातील एक गुढ ताम्रपट वाचून दाखवून सिंहासनाखाली संपत्ती असल्याचे सांगितले व सुमारे ६६ कोटी इतकी संपत्ती राजा बिज्जळास मिळवून दिली. त्यावेळी बिज्जळाने आनंदी होऊन त्यांना मंगळवेढ्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान केले. त्यावेळी चालुक्याची राजधानी कल्याण नगरी होती. तेथील चालुक्य राजा आंध्रात मांडलिकाने केलेल्या बंदच निपात करण्यास गेल्यावर तो परत आला नाही. त्यामुळे तेथील राज्यकारभारावर बिज्जळावर सोपविण्यात आला. पुढे ते राज्याचे महामंडलेश्वरपदी विराजमान होताच त्यांनी आपली राजधानी कल्याणला नेली आणि बसवेश्वरांना प्रधानमंत्रीपदी नियुक्त केले. चालुक्य आणि कलचुरी या दोन्ही राज्यांचे प्रधानमंत्री पद सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. याचवेळी राजा बिज्जळाने आपली मानलेली बहीण निलांबिका बसवेश्वरांना देऊन द्वितीय विवाह घडवून आणला. मंगळवेढ्यातील बसवेश्वरांच्या कार्याचा आढावा घेतांना कवी व अभ्यासक इंद्रजीत घुले लिहितात, “मंगळवेढा राज्याचा कारभार महामंत्री बसवेश्वरांवर सोपवून राजा बिज्जळ निश्चिन्त झाला होता. तो राजकारणात गुंतलेला तर महामंत्री बसवेश्वर जाती निर्मूलनाच्या सामाजिक आंदोलनात व्यस्त होते. मंगळवेढा परिसरात गावोगावी बसवेश्वरांविषयी प्रेम आणि करुणामय आस्था निर्माण झाली होती. कारण उच्च, मध्यम, गरीब, अस्पृश्य, कामकरी वर्गातील स्त्रीपुरुषांमध्ये परस्पर समतेची भावना निर्माण करण्यासाठी घरोघरी जाऊन त्यांच्या अडचणी आणि विचार ऐकून घेत होते. अनेक दैवतांची पूजा करण्यापेक्षा परशिवाचे इष्टलिंग शरीरावर धारण करून त्याची पूजा करण्याच्या कल्पनेचा प्रचार आणि प्रसार ते करीत होते. ज्यांना मंदिरात जाण्यास बंदी होती त्यांना हा समतेचा आणि हक्काचा पर्याय आपलासा वाटू लागला. इष्टलिंगपूजा हा केवळ एक धार्मिक विधी न राहता एक सामाजिक चळवळ झाली होती. ज्यांना मंदिरात प्रवेशबंदी होती अशा माणसांच्या हातावर शिवलिंग ठेवून त्यांना प्रतिष्ठित समाजात सामावून घेतले जावू लागले. या समता चळवळीने मंगळवेढा येथे चैतन्य आणि उल्हास निर्माण झाला. आपल्या वयाच्या २७ वर्षांपासून ते ४७ वर्षापर्यंत बसवेश्वरांनी समतेची चळवळ, क्रांतिकारक असे एक आंदोलन या भूमीत उभे केले, ज्यामध्ये अवघ्या विश्व कल्याणाची बीजे रुजली होती. त्या अर्थाने मंगळवेढा ही भूमी आद्यक्रांतीची भूमी ठरते.”

वास्तविकता मंगळवेढ्याची सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक संस्कृती पाहिली तर दक्षिणेतील भक्ती परंपरेचा प्रभाव येथील समाजजीवनावर स्पष्ट रुपात दिसून येतो. भक्ती परंपरेचा उदभव दक्षिणेतलाच. हिंदी मध्ये यासंदर्भात एक प्रसिद्ध उक्ती याप्रकारची आहे,

‘द्राविड भक्ति उपजौ-लायो रामानंद।’ महाराष्ट्राच्या परिप्रेक्ष्यात संत आंदोलनाचा विचार करताना नेहमी एक वचन सांगितले जाते, ते असे आहे- “उत्पन्ना द्रविडे साहं वृद्धि कर्नाटके गता। क्वचिचित्क्वचिन्महाराष्ट्रे गुजरे जीर्णता गता।”

म्हणजे भक्ती द्रविड देशात उत्पन्न झाली, कर्नाटकात ती वाढली, महाराष्ट्रात तिला सन्मान प्राप्त झाला; परंतु गुजरातमध्ये गेल्यानंतर मात्र ती जीर्ण बनली. भारतातील भक्ती आंदोलन हे केवळ ब्राह्मणी हिंदू धर्माविरुद्ध बंड नव्हते, तर ते त्याची वाहक नाडी असलेल्या जरठ संस्कृत भाषेविरुद्धचेही मध्ययुगाने पाहिलेले सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक असे क्रांतिकारी आंदोलन होते. भक्ती आंदोलनाची सुरुवात प्रामुख्याने पाचव्या-सहाव्या शतकात वैष्णव अलवार संतापासून सुरु झाली. तिथे जसे वैष्णव अलवार होते तसेच शैव नायनार संत ही होते. त्यांनी बहुजन समाजातून चारीही वेदांना आणि हिंदू धर्मशास्त्राला हद्दपार केले आणि त्या जागी स्वतःच्या अभंगांचे चार विभाग पाडून सामाजिक आणि धार्मिक जीवनात त्यांचेच पठण केले. आपल्या बोलीभाषेत व मातृभाषेत साहित्य निर्माण करण्याची परंपरा क्रांतिकारी संतांनी पहिल्यांदा तामिळनाडूत सुरु केली.

महात्मा बसवेश्वरांनी एका हातात तलवार आणि एका हातात चाबूक घेऊन वेद आणि धर्मशास्त्रावर हल्ला चढविला होता. ते लिहितात,

‘मी चालावीन तलवार वेदावर

घालीन बेडी धर्मशास्त्रांना

चाबूक मारीन तर्काच्या पाठीवर

कापून टाकीन नाक आगमाचे

मी आहे लाडका पुत्र

चन्नमा मोचीचा.’

महात्मा बसवेश्वरांनी समतेच्या, बंधुभावाच्या व प्रेमाच्या संस्कृतीचा पुरस्कार केला. त्यांनी वेद आणि धर्मशास्त्राच्या जोखडातून सर्वसामान्य जनतेला बाहेर काढत एका नवीन जीवन मार्गाचा पुरस्कार केला. त्यांनी मंगळवेढ्याच्या भूमीत समतेची, प्रेमाची बीजे पेरली आणि ती बीजे पुढे अंकुरली व बहरली. त्यांच्या अस्तित्वाच्या आणि कार्याच्या पाऊलखुणा आजही मंगळवेढेकरांच्या तन व मनात घर करून आहेत.


संत चोखामेळा:  

हे संत नामदेवांसोबतचे एक महान संत आहेत. त्यांचा जन्म अस्पृश्य समाजात झाला. चोखोबांच्या अभंगातील आक्रोश व विद्रोह पाहता चोखोबा ही संत तुकाराम महाराजाप्रमाणे तत्कालीन धर्ममार्तंडांच्या वाटेतील काटा बनले होते. ज्याप्रमाणे तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले ही तथाकथित धर्ममार्तंडांनी आख्यायिका प्रसारित केली आहे अगदी त्याचप्रमाणे चोखोबांच्या मृत्यूबाबत ही शंका घ्यायला वाव आहे.

संत चोखोबांच्या आयुष्याची सुरुवातच जातीय भेदभावाशी संघर्ष करण्यात झाली. ते लिहितात,

‘यातिहीन मी महार।

पूर्वी निळाचा अवतार।।

कृष्णनिंदा घडली होती।

म्हणून महार जन्मप्राप्ती।।

चोखा म्हणे विटाळ।

आम्हा पूर्वीचे ते फळ।।’

संत चोखोबांना मध्यकाळातील व्यवस्थेचा स्वीकार नाईलाजास्तव करावा लागला होता. जातीला जन्माने ठरवून दिलेल्या व्यवसायात जखडून ठेवणाऱ्या युगात चोखोबांनी केलेला संघर्ष हा मानवमुक्तीच्या दृष्टीने महत्वाचा पैलू आहे. संत चोखोबा तत्कालीन जातिव्यवस्थेच्या विरोधात विद्रोह करताना म्हणतात,            

‘हीन याती माझी देवा।

 कैसी घडे तुझी सेवा।।

मज दूर दूर हो म्हणती।

तुज भेटू कवण्यारिती।।

माझा लागताची कर।

 सिंतोडे घेताती करार।।

माझ्या गोविंदा गोपाळा।

 करुणा भाकी चोखामेळा।।’

जीवन जगत असताना व्यवस्थेतील सर्व दारे बंद होतात, तेव्हा मानवाकडे देवाच्या देवळा शिवाय दुसरा मार्ग उरत नाही. तत्कालीन वर्णवादी व्यवस्थेच्या जोखडात बहुजन लोक निराश, हताश व पराजित झाले होते. त्यांना मुक्तीचा मार्ग अंधूक वाटत होता. अशा या पराजित मनोवृत्तीमध्ये भक्तिमार्ग हा येथील जनतेसमोर एक आशेचा किरण होता. तो किरण काही वर्षांपूर्वी मंगळवेढ्याच्या मातीत महात्मा बसवेश्वरांच्या रुपात तेजोदीप्त झाला होता. त्याचमुळे चोखोबांनी मानव मुक्तीसाठी भक्तीचा मार्ग चोखाळला.

चोखोबांच्या अभंगांचे विश्लेषण करताना ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे लिहितात, “मृत्यूच्या साध्या विचाराने माणूस भयभीत होतो. ज्याच्या मनात मृत्यूचे भय दडून बसलेले असते ते ना विद्रोही बनतात ना क्रांतिकारक. ते शेवटपर्यंत शरणागतच राहतात, व्यवस्थेसमोर आणि देवापुढे सुद्धा. संतांचा विद्रोह आणि क्रांतिकारकत्व यांनी आपल्या जीवनक्रमात क्रमाने ती शरणागतता कशी तोडली हे पुढे स्पष्ट होईल.” चोखोबांनी थेट यमाला आव्हान देत भक्तीच्या अधिकारासाठी विद्रोह केल्याचे दिसून येते. अस्पृश्य समाजात जन्माला आलेल्या व्यक्तीला देव-धर्म आणि भक्तीची दारेही तत्कालीन धर्ममार्तंडांनी बंद केली होती. अशा वेळी मृत्यूचे भय संपवून चोखोबा म्हणतात,

‘गाता नाम विठ्ठलाचे। भय नाही त्या यमाचें।।

ऐसा धरावा विश्वास। नाम जपा सावकाश।।

जप तप तीर्थाटणी। नको आटणी दाटणी।।’

मृत्यूचे भय संपविलेले चोखोबा देवाविरोधात विद्रोह करताना म्हणतात,

‘असेच करणे होते तुला। तरी का जन्म दिला मला।।

जन्म देवोनी सांडीले। काही निष्ठुर मन केले

कोठे गेला माझे वेळी। केले कोणाशी सांभाळी।।

चोखा म्हणे देवा। नको मोकलू केशवा।।’

अशा प्रकारची आर्त हाक देणारे चोखोबा मान ताठ करून उभे राहिले त्याला देवाचे लबाड रूप दृष्टीगत झाले. अस्पृश्यतेचे चटके बसलेले चोखोबा तत्कालीन व्यवस्थेवर प्रहार करताना आपल्या अभंगातून व्यक्त होतात. अस्पृश्याचा स्पर्श म्हणजे विटाळ. अस्पृश्य आजन्म विटाळात बुडालेला होता. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग संत चोखोबांनी शोधला. आणि तो मार्ग क्रांतिकारी होता. हा मार्ग न नामदेवांच्या ठायी आहे न तुकोबांच्या. तो फक्त चोखोबांच्याकडेच आहे. जर जातीय भावनेतून लोक आपला विटाळ धरतात तर देवालाच विटाळसे करण्याची युक्ती फक्त चोखोबांनाचं सुचली. त्यांनी विठ्ठलाच्या मंदिरासमोर पायरीच्या पलीकडे उभं राहून अगदी हात उंचावून विठ्ठलाला व त्यांच्या भक्तांना आणि आतल्या पुरोहितांना ऐकू जाईल अशा स्वरात विचारले,

‘वेदासी विटाळ शास्त्राशी विटाळ।

पुराणे अमंगळ विटाळाची।।

जीवासी विटाळ शिकावी विटाळ।

काया अमंगळ विटाळाची।।

ब्रह्मिया विटाळ विष्णूशी विटाळ।

शंकरा विटाळ अमंगळ।।

जन्मता विटाळ मरता विटाळ।

चोखा म्हणे विटाळ आदिअंती।।’

मध्यकाळातील अनिष्ट रूढी-परंपरा विरोधात, पंडित-पुरोहितांच्या विरोधात चोखोबांनी केलेला विद्रोह क्रांतिकारी आहे. चोखोबा आपल्या अधिकाराची व समानतेची गोष्ट करतात. त्याचबरोबर समतेवर आधारलेला समाज निर्माण करण्यासाठी शास्त्राला, वेदाला परिणामी देवालाही आव्हान देतात.

संत कान्होपात्रा:

१४६८ (शके १३९०) हा कान्होपात्रा यांचा कालखंड असावा असे अभ्यासकांचे मत आहे. ज्याप्रमाणे संत परंपरेतील अनेक संतांच्या जन्म -मृत्यूचे ठोस पुरावे मिळत नाहीत. कान्होपात्रा यांचा जन्म मंगळवेढा येथे राहणाऱ्या श्यामा गणिकेच्या घरी झाला. ज्यावेळी भक्तीपरंपरेत स्त्रियांना कोणत्याच प्रकारचे स्थान नव्हते. स्त्रीला शूद्रातिशूद्र समजले जाई. अशावेळी पांडुरंगाच्या भक्तीत रममाण झालेल्या कान्होपात्रांचे आचरण हे परंपरागत व्यवस्थेच्या विरोधातील मोठे बंड होते. जरी त्यांच्या अभंगात कारुण्य व आर्तता असली तरी ती तत्कालीन व्यवस्थेला रुचणारी नव्हती. मंगळवेढ्याच्या गौरवशाली परंपरेत गौरवाचा तुरा रोवणारी संत कवियत्री म्हणजे कान्होपात्रा होय.

कान्होपात्रेने जगण्याच्या भ्रष्ट प्रकाराला त्यागून स्त्रीत्वाच्या, स्वत्वाच्या व अस्तित्वासाठी लढा दिला. ती जगण्याची परंपरागत साधने सोडून भक्तीरसात आकंठ बुडाली. आसपासच्या वासनांध वातावरणातून स्वतःला वाचवत ती पांडुरंगा चरणी लीन झाली. आपलं रक्षण करणारे कोणीच नाही उलट परंपरागत व्यवस्था भ्रष्टपणाला वाव देणारी अर्थात पाठीशी घालणारीच होती. अशा स्थितीत झालेली भावदशा कान्होपात्राच्या अभांगातून स्पष्ट स्वरूपात समोर येते. ती लिहिते,

‘नको देवराया। अंत पाहू आतां।

प्राण हा सर्वथा। फुटो पाहे।।१।।

हरिणीचे पाडस।व्याघ्रे धरियेलें।

मजलागी जाहले। तैसें देवा।।२।।

तुजवीन ठाव। न दिसे त्रिभुवनीं।

धावे हो जननी। विठाबाई।।३।।

मोकलोनी आस जाहलें मी उदास।

घेई कान्होपात्रेस हृदयांत।।४।।

मंगळवेढ्याचे अभ्यासक कवी इंद्रजीत घुले लिहितात, ‘या संत कवियत्रीचं मंगळवेढ्यामध्ये एखादं भव्य मंदिर असायला हवं होतं. पण परंपरेने जी उपेक्षा वाटायला दिली तिच उपेक्षा उरामध्ये बाळगून आजही ही कान्होपात्रा वेदनेच्या गाभाऱ्यात उभी आहे. आज तरी मंगळवेढ्यामध्ये शनिवार पेठेत काशीविश्वेश्वर मंदिराच्या पाठीमागे एक छोटसं देऊळ आहे. ते देऊळ इथल्याच कै. राहीबाई कवडे या वृद्ध महिलेने इ.स. १९७७ साली स्वखर्चाने आणि स्वतःच्या जागेत बांधले आहे. या राहीबाईच्या या कार्याशिवाय कान्होपात्रा इथं अस्तित्वहीन राहिल्या असत्या. आता त्यांचे वंशज डांगे परिवार दरवर्षी संत कान्होपात्रा यांची पुण्यतिथी साजरी करतात. दरवर्षी आषाढी वारीसाठी निघणारी संत दामाजी पंतांची दिंडी कान्होपात्राच्या या देऊळाजवळ येऊन टाळ-मृदूंगाच्या गजरात पुढे वारीसाठी निघते. आषाढी वारी नंतर येणाऱ्या आषाढी पोर्णिमेस संत कान्होपात्रा यांची पुण्यतिथी या स्थळावर साजरी केली जाते. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्येही संत कान्होपात्रा यांचे समाधी मंदिर दर्शविले जाते.’’

संपूर्ण भारतीय परिप्रेक्ष्यात बघितले तर संत कान्होपात्राला स्त्रीमुक्ती व स्त्री अस्मितेचा विचार पहिल्यांदा ठळकपणे समोर येतो. तिच्या बंडाने भक्ती आंदोलनात शूद्रातिशूद्र समजल्या जाणाऱ्या आणि त्यामध्येही गणिका असणाऱ्या स्त्रीला सन्मानाचे स्थान मिळवून दिले. संत कान्होपात्राचे स्मारक मंगळवेढ्यामध्ये व्हावे, अशी मागणी येथील जनतेची कित्येक वर्षांपासूनची आहे. परंतु सरकारची उदासीनता या मार्गातील अवरोध आहे.

याच बरोबर मंगळवेढ्यातील संत दामाजींचे आपल्या सामंताचे आदेश झुगारून भुकेल्या, दुष्काळी जनतेसाठी धान्याची कोठारे उघडून केलेले बंड याच परंपरेतील आहे. म्हणूचं मंगळवेढे ही विद्रोहाची आणि क्रांतिकारी संतांची भूमी मानली जाते.


संदर्भ:-

1.मंगळवेढे भूमी संतांची; इंद्रजित घुले; सप्तर्षी प्रकाशन मंगळवेढा; दूसरी आवृत्ती:2016

2.देशीवाद:समाज आणि साहित्य; लोकवाड्मय गृह प्रकाशन, मुंबई; दूसरी आवृत्ती:2016

3.विद्रोही तुकाराम; डॉ.आ.ह.साळुंखे; लोकायत प्रकाशन सातारा; दवितीय आवृत्ती:1999; पुनर्मुद्रण: मार्च 2008

4.हिंदी साहित्य का इतिहास; आ. रामचंद्र शुक्ल; नवीनतम संस्करण


5.प्रत्यक्ष भेटी


- प्रा.सतीशकुमार पडोळकर

(लेखक हे राजे रामराव महाविद्यालय, जत येथे हिंदी विषयाचे प्राध्यापक आहेत.)

Comments

Popular posts from this blog

भारतीयतेचे दूसरे रूप म्हणजे हिंदी: प्राचार्य डॉ.सुरेश पाटील

मनुस्मृती पुरुस्कृत दुसऱ्या प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावर आपण आहोत का? -डॉ.सतीशकुमार पडोळकर

राजे रामराव महाविद्यालयात अंधश्रद्धा: प्रभाव, परिणाम व उपाय या विषयावर कार्यशाळा संपन्न