कुशल प्रशासक :आहिल्यादेवी होळकर. - डॉ. सतीशकुमार पडोळकर
कुशल प्रशासक :आहिल्यादेवी होळकर
भारतामध्ये राष्ट्रहित व मानव हिताच्या सदरक्षणासाठी समर्पित महिलांची एक गौरवशाली परंपरा राहिली आहे. त्यामध्ये मैत्रेयी व गार्गी सारख्या विदूषी महिलांनी आपल्या बुद्धीसामर्थ्याने जगाला दिपविले तर राणी चन्नमा , राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या मृदानगी ने लढाईचे रणांगण गाजविले.तर राजमाता जिजाऊंनी स्वतंत्र स्वराज्याची ज्योत पेटविली.अशा अनेक महिला इतिहास पृष्ठावर अजरामर झाल्या आहेत. या पानातील एक सुवर्णाक्षरी पृष्ठ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आहे. आपल्या निर्मळ चारित्र्य संपन्न व्यक्तित्वाने त्या समाजकारण, धर्मकारण व राजकारणाच्या क्षेत्रात परमआदरणीय ठरल्या.संपूर्ण मानव समाजाच्या कल्याणासाठी व समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. त्यांचे संपुर्ण जीवन जनकल्याणासाठीच समर्पित होते.त्यांनी आपल्या अखंड 28 वर्षांच्या राज्यकारभारामध्ये अनेक जनपयोगी कामे केली.त्या एक कुशल प्रशासक होत्या आणि त्यांचे प्रशासकीय कसब आजच्या संदर्भात ही तितकेच प्रासंगिक आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जीवन हे अनेक दुःखांच्या धाग्यांनी विणलेले आहे. परंतू त्या कधीच आपल्या दुःखाला गोंजारत बसल्या नाहीत. त्यांनी त्यावर यशस्वी मात केली व प्रजेच्या मांगल्यासाठी अनेक कामे केली. होळकर साम्राज्य हडपण्यासाठी आक्रमण करु पाहणाऱ्या राघोबादादांना त्यांनी योग्य शब्दांत चाप दिला आणि आक्रमणाचे आव्हान दिले.त्या म्हणाल्या 'श्रीमंत राघोबादादा पेशवे, दौलतीचा लोभ धरून राज्यावर चाल करण्याचा मनसुबा मनी धरू नका. तसे असेल तर मीही स्त्री सैन्यांसह युद्धाला सज्ज आहे.पण विचार करा.मी बाईमाणूस.मी युद्धात हरले तर काहीच बिघडणार नाही.पण चुकून तुम्ही हरलात तर बाईमाणसाकडून हरलात म्हणून तुमची फजिती होईल.बाहेर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आपल्या ध्यानात असू द्या की मी सुभेदारांची सून आहे.सुभेदारांच्या पुण्य पराक्रमाने येथे मी काही नुसत्या बांगड्या घालून बसलेली नाही.करणारा आणि करवून घेणारा मार्तंड समर्थ आहे. सर्व काही तोच आहे.मी जे काही सामर्थ्य आणि सत्तेच्या जोरावर काम करत आहे.त्याचा जबाब मला परमेश्वरास द्यायचा आहे.हाच माझ्या जीवनाचा आदर्श आहे.' आहिल्यादेवी मुत्सुदी राजकारणी व प्रशासक होत्या.
त्यांच्या राजकारणाला व प्रशासनाला एक नैतिक अधिष्ठान होते आणि ते अधिष्ठान एकंदरीत त्यांच्या राज्यकारभाराचे शक्ती स्थान ही होते. त्यांनी गोरगरीब लोकांना लुटून आपली तुंबडी भरणाऱ्या भिल्लांना वठणीवर आणले व प्रसंगी त्यांना तुरुंगात ही डांबले. त्यांनी भिल्लांचा पुरता बंदोबस्त केला परंतू त्यांच्या उदरनिर्वाहाची पर्यायी व्यवस्था ही केली.त्यांनी त्यांच्यासाठी जमिनी दिल्या.काम-धंदा दिला.चोरी करुन भूक भागविणाऱ्या समाजाच्या पोटाला घास दिला.यात्रेकरूंना लुटणाऱ्या भिल्लांवरच यात्रेकरूंच्या रक्षणाची जबाबदारी टाकली.राज्यातील समस्येवर मात करण्याची त्यांची हातोटी आदर्शवत होती. आहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले. त्याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या घरापासून केली. त्यांनी आपल्या मुलीचा विवाह दुसऱ्या जातीतील यशवंतराव फणसे यांच्याशी करून दिला व वर्णव्यवस्थेच्या चौकटीत जगणाऱ्या समाजासमोर एका नवक्रांतीची बीजे रोवली.एका आदर्श राज्यकर्ता कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहिल्यादेवींचे प्रशासन होते. आहिल्यादेवी दूरदृष्टी असणाऱ्या प्रशासक होत्या त्यांनी संपूर्ण भारतभर मंदिरे उभारली. घाट बांधले,धर्मशाळा उभारल्या, तलाव खोदले, विहिरी खोदल्या, अन्नछत्रे उभारली,पाणपोई सुरु केल्या.त्यांनी उभारलेल्या सर्व वास्तू अजून ही त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात.त्यांनी पारदर्शक प्रशासन करण्यासाठी अनेक कायदे-कानून केले व त्याची अंमलबजावणी विवेकशील पणे केली.यासंदर्भात त्यांचे मत होते की,'एकदा जो कायदा निर्माण केला त्याचे पालन व्यवस्थित केले पाहिजे.यामुळेच सर्वजण कल्याणाच्या मार्गाने जाऊ शकतील.कायद्याविरुद्धचं वर्तन सहन करता कामा नये.' कायद्यासमोर त्या सर्वांना समान मानत होत्या. त्या एक विवेकवान व न्यायी प्रशासक होत्या.त्यांच्या न्यायदान पद्धतीतून त्यांचे पुत्र ही सुटू शकले नाहीत.अहिल्यादेवींनी आपल्या राज्यात लोक-कला व लोकसंस्कृतीला मोठ्या प्रमाणात संरक्षण दिले. त्या खऱ्या संस्कृतीरक्षक प्रशासक होत्या.त्यांनी युद्धात शहीद होणाऱ्या सैनिकांच्या परिवाराची जबाबदारी स्वतः उचलली व तसा कायदा ही बनविला.आपल्या जवळपास तीन दशकांच्या राज्यकारभारात त्यांनी कधीच कोणावर अन्याय केला नाही व कोणावर होऊ दिला ही नाही.आपल्या राज्यात व्यापाराला मोठ्या प्रमाणात उत्तेजन दिले त्याचमुळे महेश्वर त्यावेळी व्यापाराचे केंद्र बनले.त्यांच्या या महान कार्याचा गौरव करताना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, 'अहिल्यादेवींच्या काळात प्रजा सुखी होती.सर्वत्र समाज व्यवस्था नीट होती.राज्यकारभार नीट चालला होता."आदर्श कारभार म्हणजे अहिल्या देवीचा"अशी म्हणच पडली होती.ती कर्तृत्ववान असून राज्याची नीट घडी बसवणारी होती.त्या काळात भारताच्या बहुसंख्य भागात राजकीय अस्वस्थता आणि अस्थिरता होती.त्यांनी खुबीने युद्धे टाळली व आपल्या प्रदेशात शांतता प्रस्थापित करून राज्य समृद्धशाली बनवले. त्यांच्याविषयी सर्वांच्या मनात पूज्यभाव होता.मृत्यूनंतर प्रजा तिला संतस्वरूप देवता मानू लागली.' अनेक इतिहासकारांनी त्यांच्या गौरवशाली कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.
भारताच्या इतिहासात अहिल्यादेवींचे नाव एक सतशील, युगकर्ती,संतुलित विवेकशील राज्यकर्ती, न्यायी राजमाता,लोकमाता म्हणून कोरलं गेलं आहे.पुण्यश्लोक हे नामाभिधान त्यांना जनतेने बहाल केले आहे.राज्यकर्त्याकडे कोणते सद्गुण असावेत याचे एकमेव मूर्तीमंत आदर्श व्यक्तीमत्व म्हणजे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर होय.त्यांच्या पुण्यतिथी निम्मित त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन!
- डॉ.सतीशकुमार पडोळकर(राजे रामराव महाविद्यालय, जत)
Comments
Post a Comment